मानव धर्म पताका खांद्यावरी । करुया पुण्यार्थ एकदातरी कौंडण्यपूर वारी ॥
कौंडण्यपूर गांवाचे नांव ऐकताच डोळ्यासमोर भावविश्व उभे राहते ते पूर्णब्रह्म भगवान श्रीकृष्णाच्या सासूरवाडीचे स्थान. भगवंतानी याच कौंडण्यपूराहून त्यांची पट्टराणी (अग्रमहिषी) श्री रुख्मिणी हिचे हरण केले होते. विदर्भ राजा भिष्मकाची ती लावण्यवती राजकन्या होती.
राजा भिष्मक कन्या माता रुख्मिणी, प्रभू रामचंद्राची आजी राजा दशरथाची आई इंदुमती, नलराजाची राणी दमयंती, श्री अगस्ती ऋषीची पत्नी लोपमुद्रा, स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणणाऱ्या श्री भगीरथ राजाची माता केशिनी, या पंचमहासतांचे माहेर तसेच नाथ संप्रदायातील श्री. चौरंगीनाथ या सर्वांचे स्थान कौंडण्यपूर होय. वशिष्ठा (वरदा) आजची वर्धा नदीच्या पात्रात पुंडलिक नावाचे कुंड आहे.
अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीच्या काठावर उभ्या असलेल्या या गांवात शिरताच सर्वत्र पांढरीच्या (राखेच्या) टेकड्या दिसतात. पांढरीचे टेकडी ही प्राचीन काळच्या मानव जातीच्या अस्तीत्वाचे ठिकाण असते. अशा अनेक टेकड्यावर वसलेल्या या कौंडण्यपूर नगरीचे पुराणवस्तु विभागा तर्फे संशोधनाचा अल्पसा प्रयत्न सन १९२८ मध्ये कै. श्री.अ.रा. रानडे यांनी केला. सन १९४६ मध्ये पुरातत्व विभागाचे जाणकार रायबहादूर का. ना. दिक्षीत यांनी प्रयत्न केला आणि त्यानंतर १९६२ ते १९६४ या कालावधीत डॉ. मोरेश्वर दिक्षीत यांनी विस्तृत उत्खनन करून अनेक पुरातत्व अवशेष उघडकीस आणले. इ.स. ५०० पासूनचे अवशेष येथे आढळतात. म्हणजे हे गांव २५०० वर्षे इतके प्राचीन आहे.
रुख्मिणी मातेच्या मंदिरापासून १ कि.मी. अंतरावर उंच टेकडीवर पुरातन जागृत श्री अंबामातेचे पवित्र मंदिर उभे आहे. रुख्मिणी मातेस भगवंतानी याच मंदिरात देवीची ओटी भरण्यास बोलाविले व जवळच्याच भुयार मार्गानी रुख्मिीणीचे हरण केले. त्यावेळी येथे घनघोर युद्ध झाले व त्यात रुख्या व शिशुपालाचा दारूण पराभव झाला. या परिसरात असंख्य असे सर्व समाज बांधवांनी बांधलेले पुरातन पवित्र मंदिर मोठ्या डोलाने उभी आहेत. त्यात श्री संत रविदास महाराज मंदिर, श्री संत नरहरी सोनार महराज मंदिर, श्री सत्यनारायण भगवान मंदिर, श्री जैन मंदिर, श्री शिव मंदिर, श्री दत्त मंदिर श्री प्रभू विश्वकर्माचे मंदिर याशिवाय अनेक छोटी-मोठी देवालयांनी हा परिसर व्यापलेला आहे..
श्री संत सदगुरु सदाराम महाराजांनी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर ते पंढापूर आषाढी पायदळ मालखी साहेळा सन १५९४ साली सुरु केला ती परंपरा आजतागायत अखंडसुरु असून त्यात २०० ते २५० भाविक भक्त सहभागी होतात आज या पायदळ दिंडी सोहळ्याम ४२४ वर्षांचा इतिहास आहे. आषाढीला पंढरपूर येथे जाणारी ही महाराष्ट्रातील पहिली पालखी होय. श्री संत सदगुरु सदाराम महाराजांना वृद्धापकाळामुळे वारी कठीण झाली. त्यावेळी स्वत: श्री पांडुरंगाने दर्शन देवून, "मी स्वतः श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे तुझ्या भेटीस दरवर्षी कार्तिक पौर्णिमा व प्रतिपदेला येत जाईन असे वचन दिले". तेंव्हांपासून कार्तिक मासामध्ये कौंडण्यपूर येथे फार मोठी यात्रा भरते व कार्तिक शु. प्रतिपदेला दहीहंडी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतो. या सोहळ्यास अनेक संत महंत व भाविक पालख्यांसह फार मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. कार्तिक मासामध्ये श्री पंढरपूरचा राजा श्री पांडुरंग या ठिकाणी वास असतो. अशी तेव्हांपासून भाविक मक्तांची श्रद्धा आहे.
या पवित्र कौंडण्यपूरची जोपासना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्यमुर्ती श्री. संत गाडगे महाराज, वंदनीय श्री. संत अच्युत महाराज यांनी केली. आजही मंदिरात काकडा आरती, हरीपाठ, अभिषेक व पुजापाठ नियमित सुरु आहे. कार्तिक यात्रेनिमित्त वर्धा नदीच्या वाळवंटात वं. राष्ट्रसंताचे भजन होत असते. याशिवाय श्री. संत अच्युत महाराजांचे दहीहंडी सोहळ्याचे वेळी भक्तियुक्त प्रवचन होत असते. याचा असंख्य भाविक अगदी मंत्रमुगध होवून लाभ घेत असत. उशिरा का होईना आज या पवित्र नगरीची जोपासना करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनांनी घेतल्याचे दिसून येनें. हे आपले भाग्य होय. आपल्या पुरातन पुण्य स्थळाची जोपासना करण्याची जबाबदारी प्रामुख्यानी आपल्या सर्व परिसरातील भाविक भक्तांची आहे.